सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

!!!!!!!खडतर हा मार्ग अजुनी!!!!!! (Part 1)

एका अश्या निवडणुकीचा निकाल आलाय ज्याकडे अनेकार्थाने अनेकजण डोळे लाऊन बसलेले होते. अर्थतज्ञांपासून राजकीय-सामाजिक अभ्यासक आणि सर्वसामान्य जनता. हा एकच निकाल असा होता ज्यानं कित्येक प्रफुल्लीत चेहरे सुकवले आणि हिरमुसलेले चेहरे खुलवले. अनेक अर्थाने ही निवडणूक उत्साहवर्धक होती, दूरगामी परिणामांची नांदी ठरू पाहणारी होती. मग या निकालांचा विश्लेषणही खूप मागचा भूतकाळ आणि खूप पुढचा भविष्यकाळ पाहूनच व्हायला हवा. मुळात या निकालांचा अर्थ लालूंच पुनरागमन, मोदींचा पराभव आणि नितीश यांचा दिग्विजय असा काढणं मर्यादीतच होईल. या निकालांनी कित्येक प्रश्नांची उकल केली आहे पण सोबतच अनेक प्रश्न नव्याने उभे केले आहेत. निवडणुकीने दिलेली धड्यासोबत उभ्या केलेल्या प्रश्नांचा म्हणूनच धांडोळा अगत्याच ठरतो. अजून एक, या निवडणुकीला काही वैयक्तिक नात्यांची किनार आहे तसीच तिरस्कार, उपेक्षा आणि अपमानाचीही किनार आहे.
निवडणूक आयोगानं जरी निवडणुकीची अधिसूचना २ महिन्यांपूर्वी जारी केलेली तरी या निवडणुकीला खरी अप्रत्यक्ष सुरुवात नितीशकुमारांच्या रालोआ मधून बाहेर पडण्यानं झालेली आणि प्रत्यक्ष सुरुवात झाली ती लोकसभेचा निकाल लागला त्या संध्याकाळी.
तसा २-३ वर्षांचा फरक दुर्लक्षित केला तर नितीशकुमार आणि मोदी यांचा राज्याभिषेक समकालीन. दोघांमध्ये दोन गोष्टींचं साम्य: एकाला चालवायला एक बिमारू राज्य भेटलं तर दुसऱ्याला सततच्या दंगलींनी होरपळून निघणारं आणि दुसरं साम्य हे की एकाची नेमणूक पक्षांतर्गत असंतोषातून तर दुसऱ्याची नेमणूक अनागोंदी कारभारातून झालेली. आणि अजून एक साम्य म्हणजे दोघंही एकाच गोटातले. फरक इतकाच की एकाकडे कसलाच प्रशासकीय अनुभव नव्हता आणि एकाकडे केंद्रीय रेल्वे आणि कृषी मंत्रालायचा तसेच ८ महिन्यांच्या अल्पकाळाचा मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव होता. सुरुवातीला दोघांमध्ये निकोप गोडी होती आणि एकमेकांचं कौतुक ही होत. जसजसं काळ पुढे सरकू लागला तसतसं मोदींच्या मागे चौकशीचा आणि आरोपांचा ससेमिरा लागला. यातून मग मोदींपासून दुरावा राखणं ही नितीशजींची राजकीय गरज बनू लागली. पण ही राजकीय अपरिहार्यता हळूहळू तीव्र होत गेली, तिचं रूपांतर तिरस्कारात होऊ लागल आणि शेवटी अपमानात. अगदी मग युती करताना मोदींना प्रचारापासून दूर ठेवण्याच्या शर्थीही ठेवल्या आणि स्वीकारूही जाऊ लागल्या. स्थानिक राजकारणामुळ तसं करणं नितीशकुमारांची गरज आणि पक्षासाठी ते सहन करणं मोदींची मजबुरी बनत गेली. काळाच्या ओघात आणि मुठभर विरोधकांच्या अहोरात्र मेहनतीन मोदीजी राष्ट्रीय पर्याय म्हणून समोर आले तर नितीशजी राष्ट्रीय चेहरा. भाजपनं मोदीजीना आधी प्रचारप्रमुख आणि नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि नितीशजीनी स्वताला रालोआपासून वेगळं केलं. तसं मोदीजी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित होण्यामागं नितीशकुमारांचही योगदान अमुल्य. कारण त्यानी रालोआचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून सततचा तगादा लावला नसत तर कदाचित भाजपने तितक्या लवकर मोदींना तिलक लावला नसता आणि मोदींना इतका कालावधी मिळालाही नसता सर्वाना नेस्तनाबूत करायला. पण त्या क्षणी दोघांनी स्वताचे स्वतंत्र मार्ग पकडले आणि एका वर्तुळाकारी चाक्रव्ह्युवाला सुरुवात झाली.
नितीशकुमारांचा अहंकार आणि निर्णय बिहारी लोकांना आवडला नाही आणि त्यांनीही मताचे भरभरून दान मोदींच्या पारड्यात टाकलं इतकं की मोदी आणि त्यांचे सवंगडी वगळता सगळेच भुईसपाट झाले. त्या लाटेच्या तडाक्यात मोदीजी पंतप्रधान झाले आणि नितीशकुमारांना राजीनामा द्यावा लागला. तिथेच नाटकाचा दुसरं अंक चालू झाला फक्त बदलली ती पात्रं आणि त्यांच्या भूमिका आणि पुन्हा एका बदलाची सुरुवात तिथून झाली. इतके दिवस मोदीजी स्वताला प्रस्थापित करायला आणि नितीशजी त्यांना विस्थापित करायला लढत होते पण पण पण दुसऱ्या अंकाची सुरुवातच मुळी नितीशकुमारांनी स्वताला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आणि मोदीजीनी त्यांना विस्थापित करण्यासाठी म्हणजे पहिल्या अंकाच्या पूर्णपणे विरुद्धार्थी केली. दुसऱ्या अंकात अजूनही थोडासा बदल झालेला. मोदीजी देशविदेशात पडद्यावर अहोरात्र झळकू लागले, प्रशासन आणि शासन यांना सोबत घेऊन दौडे लागले, अडखळूही लागले. मधेच प्रचारकी वस्त्र नेसून लाखोंच्या सभा गाजवूही लागले. त्यांचे काही साथीदार खर्या आणि खोट्या गोष्टी पेरून त्यांचं प्रतिमवर्धन करू लागले. पहिल्या अंकात रणनीती शांतपणे राबवलेले अमित शहा रणनीतीकार बनून पुढे सरसावले अध्यक्ष बनून पक्ष आणि संघटना चालवू लागले. नितीशकुमार मात्र स्वताचा अहंकार बाजूला ठेऊन आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या आणि मोठ्या विरोधकाच्या म्हणजे लालूजींच्या दारी गेले. तसं बिहारच्या राजकारणातला एकेकाळचा हा राजा फक्त २२ की २८ आमदारांसह मुख्य पडद्याहून गायब आणि प्रभावहीन झालेला. त्यामुळं पक्षासाठी नाही पण स्वताच्या पुढच्या पिढीला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनाही नवीन मित्राची- पर्यायाची गरज होतीच. पण लालूंच्या मनात थोडीशी अडी शिल्लक होती पण चाणाक्ष नितीशकुमारानी सोनिया गांधी यांची भेट घेऊन लालुना निर्वाणीचा संकेत दिला आणि ४ मोठ्या पक्षांची एक महाआघाडी जन्माला आली. आणि इकडे अमित शहानी ३ छोट्या पक्षांना सोबत घेऊन आपलीही आघाडी मजबूत केली. मुख्य सामना सुरु होण्याअगोदर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. मोदींनी शहांना सोबत घेऊन झारखंड हरियाना ही राज्य एकहाती तर महाराष्ट्र आणि जम्मू-काशीम ही राज्य जवळपास एकहाती काबीज केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ६३ आमदार निवडून देऊन आणि दिल्लीत भाजपचे पूर्ण पानिपत करून जनतेनं एक वेगळा संदेशही दिला होता पण कौल समजून घेतील ते राजकारणी कसले. मिळालेलं यश म्हणजे कर्तुत्व आणि अपयश म्हणजे मतदारांची चूक असं गणित मनात बसलं की मग राजकीय प्रवास सोपा होतो पण मार्ग मात्र भाराकातोत जातो. आणि पुन्हा सावरतील ते राजकारणी कसले?????

(क्रमश.........)

Nivrutti Sugave..

1 टिप्पणी: