सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

सोयाबीन आणि मरणासन्न उदासीनता......

लहानपणापासूनच्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवायचा तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण कृषिप्रधान असणे म्हणजे नेमकं काय हे या देशातल्या सरकारांना, राजकीय पक्षांना कळलंय का हा नेहमी पडणारा प्रश्न. शेतकऱ्याच्या हातात लाख अडचणींचा सामना करत सोयबीनचे पीक पडले आणि सवयीची त्याची कृषी बाजारातली दयनीय अवस्थता पाहून तो प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला. असं  वाटतं की बळीराजा, जगाचा पोशिंदा अशा पदव्या देऊन आपण त्याला मरायला सोडून मोकळे झालो आहोत. सरकारं बदलली, नेते बदलले पण शेतकऱ्याची परवड थांबायला तयार नाही. कर्जाच्या जंजाळातून शेतकरी कायमचा सुटला पाहिजे, शेतीला जोडधंण्याची जोड भेटावी, शेतीला मुबलक पाणी पुरवठा भेटावा, २४ तास वीज असावी, सिंचनयुक्त शेती असावी, शेतमालाला उत्पन्न आधारित हमीभाव भेटावा, शेतीत गुंतवणूक व्हायला हवी या अशा मागण्यांना देशातल्या तमाम पक्षांचा तोंडपाटीलकी इतका पाठिंबा आहे, सगळे पक्ष यासाठी कटिबद्ध आहेत आणि इतकं असूनही ना जमिनीवर काही बदलत आहे ना शेतकऱ्याच्या आयुष्यात काही सुधारत आहे. पाऊस पडतो, शेतकरी कर्ज काढून उसनवारी करून पेरणी करतो, पाऊस गायब होतो, पाऊस येईल या आशेवर शेतकरी पुन्हा फवारणी करतो, खुरपणी करतो, अर्ध पीक करपून जातं मग पाऊस परततो, कापणी, मळणी करून थोडाबहुत माल हातात लागतो, तो बाजारात जातो, भाव पाडून शेतकरी लुटला जातो, थोडाबहुत आलेला पैसा व्याज फेडण्यात जातं पुन्हा शेतकरी रब्बीच्या पेरणीला नव्या कर्जाच्या तयारीला लागतो, मागची कित्येक वर्ष थोड्याबहुत फरकाने, सरकारी आशीर्वादाने हेच चक्र चालू आहे. ना हि साखळी तुटायला तयार आहे ना शेतकऱ्याला ह्या दुश्चक्रातून कुणी बाहेर काढायला तयार आहे. ४० वर्ष शेतकऱ्यांचे जाणते राजे सत्तेत होते, ३ वर्ष झाले विकासवाले सत्तेत आहेत त्यांच्या जोडीला शेतकऱ्यांचे आंदोलनकारी नेते आहेत पण तरीही हापापाचा माल गपापाला सुरूच आहे.
सोयाबीन तसं मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या महत्वाच्या पिकांपैकी एक. भारतात वर्षाला साधारणपणे ११०-११५ लाख टन इतके सोयाबीन उत्पन्न होते, त्यातला जवळपास ४५ लाख टन इतका सर्वाधिक वाटा मध्यप्रदेशचा त्यानंतर ३९ लाख टन इतका वाटा महाराष्ट्र राज्याच्या. म्हणजे सोयाबीन या पिकाचे महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व. त्यात मागच्या वर्षी तुरीने शेतकऱ्याला अक्षरशा रडवलेलं, म्हणजे या वर्षी सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा ओघाने आलाच. आपली देशांतर्गत वार्षिक गरज ही ८० लाख टनांच्या आसपास. गरजेपेक्षा जवळपास दीडपट उत्पन्न म्हणजे चांगल्या भावासाठी निर्यातपूरक धोरण ही अपरिहार्यता हे सोपं  गणित. एखादा अडाणी शेतकरी ज्याला साधी सहीसुद्धा करता येत नाही त्याच्या घरी एखादी गाय-म्हैस असेल जी २ लिटर दूध देत असेल तर अगोदर तो घरी किती दूध लागेल याचा अंदाज बांधतो, तितकं वगळून बाकीचं दूध गरजवंताला किंवा दूध व्यावसायिकाला विकतो. हे इतकं साधं गणित कुण्या अडाणी माणसालाही सहज कळेल ते तज्ञांचा इतका भरणा असलेल्या सरकारांना आणि प्रशासनाला कसं कळत नाही? आणि त्यांना कळत असेल तर मग सरकारी पातळीवर काहीच हालचाल का नाही झाली?? आज खाद्यान्नाच्या पडलेल्या भावाला केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरणात सर्वाधिक जबाबदार आहे. देशांतर्गत गरज ८० लाख टन आणि उत्पन्न १०० लाख टन असताना धोरण हे आयात पूरक असूच कसं शकतं?? पामतेलाच्या आयातीला प्रोत्साहन देणारं धोरण असूच कसं शकतं?? एकेकाळी पामतेलावर ९०% च्या आजपासी असणारे आयात शुल्क आज १५ टक्यांवर आहे (अर्थतज्ञांच्या UPA ने तर ते शून्यावर आणलेले). उत्पन्न गरजेपेक्षा जास्त आहे, देशान्तर्गत साठा मुबलक आहे मग आयातीवर ५०-६०% आयातशुल्क लावायला आणि निर्यातीला प्रोत्साहनपर बोनस द्यायला काय अडचण आहे??. ६० रुपयात पामतेल आयात व्हायला लागलं तर ऑईलमिल्स कशा जगतील?? एकेकाळी अडीच लाखाच्या घरात असणाऱ्या ऑईलमिल्स आज फक्त १५००० इतक्या शिल्लक आहेत. मेक इन इंडिया हा या सरकारने गाजावाजा केलेला कार्यक्रम पण मग शेतकऱ्याचा माल प्रोसेस करणारे उद्योग त्यात का येत नाहीत?? महागाई वाढू ना देणं हि सरकारची जिम्मेदारी हे मान्य पण मग शेतकऱ्याचा विचार करणं हि जिम्मेदारी नाही का?

आपला नशीब चांगलं (दुर्दैवाने) कारण या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात १७% इतकी घाट अपेक्षित आहे, महाराष्ट्रात तीच घाट २० टक्क्यांच्या आसपास असेल. बर हि घट काही लागवडीचे क्षेत्र खालावले म्हणून नाही तर पीकभरणीच्या दिवसात पावसाने दडी दिली म्हणून आहे. महाराष्ट्राच्या उत्पादनात २०% घट म्हणजे जवळजवळ सगळ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात सरासरी १५-२०% घट. दुसरी बाजू म्हणजे लागवडीच्या खर्चात कुठं घट आहे का?? तर नाही. रोजंदारी, खत, बी हे सगळं मागच्या वर्षीच्या तुलनेत महाग, उत्पन्न २०% कमी म्हणजे सोयाबीनची MSP (किमान आधारभूत किंमत) ही अधिक असायला हवी होती. पण गोरगरिबांच्या कैवारी सरकारने आधारभूत किंमत ठरवली ती २८५० रुपये प्रति क्विंटल आणि २०० रुपय बोनस म्हणजे एकूण ३०५०. म्हणजे ज्या सरकारला आपण मायबाप म्हणतो त्यानी आधारभूत किंमत ठरवताना इतकी तजवीज केली आहे की शेतकऱ्याला सोयाबीन पीकाच्या उत्पादनातून काडीचाही फायदा होणार नाही. सरकारची कदाचित तशी मानसिकता नसणार पण धोरणं मात्र तशी हमखास आहेतच.
सरकारनं नाफेडमार्फत शेतमाल थेट खरेदी करण्याचा चांगला निर्णय घेतला. पण पुन्हा एक उपप्रश्न पडतो की फक्त निर्णय घेणं सरकारची जबाबदारी आहे कि निर्णय घेऊन ते राबवणं सुद्धा?? आणि निर्णय राबवणं हि जबाबदारी असेल तर सरकारनं स्वतःच शेतकऱ्याच्या वाटेत काटे पेरलेत, आणि ते काटे म्हणजे खरेदीचे निकष. सरकारची पहिली अट म्हणजे माल खरेदी केंद्रावर आणण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि सातबारा आणून जमा करायचा, मग शासन त्यांना माल घेऊन यायची तारीख कळवणार आणि मग खरेदी होणार. मागच्या वर्षी बऱ्याच व्यापाऱ्यांनी पडत्या किंमतीत शेतकऱ्याकडून विकत घेऊन तो सरकारला विकला म्हणून हि अट राज्य सरकारने आणली आणि निःसंशय हेतू प्रामाणिक आहे. पण मग राज्य सरकार आपलं प्रशासन जमिनीवर काम कसं करतं याबाबतीत पार अज्ञानी आहे असंच म्हणावं लागेल. ७५% पेक्षा अधिक अधिकारी हे शेतमालाची नोंद बांधावर न जाताच करतात. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर सोयाबीनच्या क्षेत्राची नोंदच नाही पण त्याने उत्पन्न घेतलं आहे तर त्यांनी काय करायचं? दुसरं म्हणजे २२ FAQ पेक्षा अधिक FAQ असलेलं सोयाबीन सरकार खरेदी करणार. पेरणीनंतर जवळजवळ २ महिने पाऊस गायब होता म्हणजे गुणवत्ता ही प्रभावीत झालेली असणारच. मग जो ह्या कसोटीवर पास होणार नाही त्या शेतकऱ्याला खुल्या बाजारात लुबाडणूक व्हायला सरकारच ढकलत आहे असं म्हणणं गैरलागू होणार नाही. बर प्रत्येक नाफेड केंद्रावर गुणवत्ता तपासणी शास्त्रशुद्ध पद्धतीने होणार का? खरेदीकेंद्रावरचे कर्मचारी गुणवत्तेच्या नावाखाली पिळवणूक करणार नाहीत यासाठी काही यंत्रणा आहे का?? अशा एकाही प्रश्नाचं उत्तर सकारात्मक नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सरकारनं खरेदीचं ठरवलेलं उद्दिष्ट. उत्पन्न ३१ लाख टन आणि खरेदी उद्दिष्ट १ लाख टन. म्हणजे ९६% माल हा खुल्या बाजारातच विकला जाणार. ४% शेतकऱ्यांना लुबाडलं जाण्यापासून रोखणं आणि ९६ टक्यांना  वाऱ्यावर सोडणं हि कामगिरी आणि धोरण फक्त आणि फक्त लाजिरवानच असू शकतं.
सरकारने व्यापाऱ्यांना किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी न करण्याचे आणि केल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट इशारे दिलेत पण आपल्या देशात सरकारी इशाऱ्यांचे गांभीर्य नव्याने सांगायची गरज नाही. सरकारी इशारे म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या उक्तीला साजेशे. आणि म्हणूनच की काय सोयाबीनची खरेदी उघडपणे १५०० ते २४०० च्या दराने चालू आहे किंवा कुठे कुठे चालूच नाही. आणि सरकारच्या इशाऱ्यानंतरही परिस्थिती बदलायला तयार नाही हे या सरकारचं खूप मोठं प्रशासकीय अपयश  आहे. फडणवीस सरकारने जलयुक्त शिवारसारखी अत्यंत चांगली योजना राबवली, ३ वर्षात अनुदान विम्याच्या रूपातही शेतकऱ्यांना चांगली मदत मिळाली आहे, गुंतागुंतीची पण ३४००० कोटींची कर्जमाफीची होऊ घातलीय पण हेच सरकार केंद्र सरकारला आयात निर्यात धोरणावर विचारसुध्दा करायला लावू शकलेलं नाहीये, शेतमालावर आधारित उद्योगांसाठी एखादं उमदं धोरण आखू शकलेलं नाहीये आणि आपणच ठरवलेला भाव सुध्दा शेतकऱ्यांना सक्तीने मिळवून द्यायला ठार अपयशी ठरलेलं आहे. शेतीत गुंतवणूक नाही असा गळा काढायचा पण गुंतवणुकीला ४ पैसे शेतकऱ्याच्या पदरात शिल्लक राहतील अशी धोरणं मात्र आखायची नाहीत. शेतात गुंतवणूक हि फक्त शेतकरीच करू शकतो आणि जोपर्यंत ४ पैशांचा फायदा त्याच्या घरी जाणार नाही तोपर्यंत शेतीत गुंतवणूक हि फक्त सांगण्यापुरतीच गोष्ट राहणार. शेतकरी माल घेऊन सरकारच्या दारात उभा आहे आणि सरकार आत्ता जागं होऊन दिल्लीत मिटींग्स लावत आहे यापेक्षा दुर्दैव हे काय असू शकतं.
जे सोयाबीनच्या बाबतीत झालं तेच २ महिन्यांनी तुरीच्या आणि इतर पिकांच्या बाबतीत होईल. सरकार बदललं, कारभारीही बदलले पण शेतकऱ्याच्या गळ्याचा फास कधी निघणार देव जाणो!!!!

- निवृत्ती

बुधवार, २६ जुलै, २०१७

१८० कोणीय राजकारण .....

जे होण्याचा अंदाज नोव्हेंबर महिन्याच्या मध्यासच आलेला ते आज अखेर झाले, आणि मोदी विरोध या केवळ एका तत्वावर अस्तित्वास आलेले जदयू-आरजेडी-काँग्रेस हे महागठबंधन आज एकदाचे विसर्जित झाले. फक्त ते नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने घडून येईल याचा कुण्याही राजकीय पंडिताला अंदाज आलेला नव्हता. नोटबंदीला साथीदारांचा विरोध डावलून नितीश यांनी मोदींचं केलेलं समर्थन, राष्ट्रपतीपद निवडणुकीत दिलेलं तातडीचं समर्थन अशा अनेक गोष्टी एक संकेत देत होत्या कि महागठबंधन नावाचं ओझं खांद्यावर घेऊन नितीश कुमार यांना त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं दूरगामी भविष्य दिसत नव्हतं.
सगळी हिंदी चॅनेल्स, त्यांचे तथाकथित राजकीय पंडीत नितीश कुमार तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेणार किंवा त्यांची हकालपट्टी करणार हे एकच भाष्य मागचे १५ दिवस झालं ओरडून ओरडून सांगत होते पण नितीश यांनी चाणाक्ष्यपणे सर्वांना चकित करून टाकले. घटनात्मक दृष्ट्या एखाद्या मुख्यमंत्र्याने राजीनामा देणे म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होणे असतो, म्हणजे धूर्त मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि आरजेडीच्या मंत्र्यांच्या मंत्रिपदाचं घटनात्मक अस्तित्व काढून घेताना स्वतःचं प्रतिमावर्धन करून घेतलं. नितीश कुमार यांचा राजीनामा हि एक घटना दिसत असली तरी ती अनेक घटनांची मालिका आहे आणि म्हणून त्याचं वास्तुदर्शक विश्लेषण गरजेचं...

बिहारच्या आजच्या परस्थितीवरून २ गोष्टी स्पष्ट झाल्या: १ नितीश कुमार हे आजच्या मोजक्याच चाणाक्ष आणि धूर्त नेत्यांपैकी एक प्रमुख नाव नक्की आहे आणि २ नितीश कुमार हे देशातील सगळ्यात मोठं  लवचिक राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी ते ९०, १८०, ३६० अशा कितीही अंशात भूमिका लीलया बदलू शकतात. मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी पक्कं होताच धर्मनिरपेक्षतेचं कोंडबोलं पुढं करत नितीश यांनी भाजप आणि रालोआला रामराम ठोकला. तेंव्हा देशात अल्पसंख्यांक व्होटबॅंकेचं आपलं एक महत्व आणि राजकीय दबाव होता आणि तो दबाव झुगारून मोदी निर्विवाद बहुमतासह पंतप्रधान होणार नाहीत आणि देश कदाचित त्रिशुंक अवस्थेत जाईल असा त्यांचा अंदाज होता. तसं झालं असतं आणि काँग्रेसवर बाहेरून पाठिंबा द्यायची वेळ आली असती तर  शरद पवार आणि नितीश कुमार हि दोनच नावं सर्व आघाड्यांवर सर्व पक्षांना मान्य होऊ शकले असते. पण नितीश कुमारांचा तो राजकीय जुगार पुरता फसला. त्या एका निर्णयानं त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं खूप नुकसान केलं. नितीश यांना देखाव्यासाठी का होईना पण राजीनामा द्यावा लागला, ज्या लालूंना जंगलराज,भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं त्यांच्याच चरणी मदतीसाठी धावावं लागलं, राजकीय भविष्य  हरवलेल्या काँग्रेसला सोबतीला घ्यावं लागलं. त्यांच्या पक्षालाही खूप मोठी किंमत चुकवावी लागली. ज्या विधानसभेत १११ आमदार होते त्याच विधानसभेच्या निवडणुकीला १०० जागी फक्त निवडणूक लढवता आली, विधानसभेतलं सगळ्यात मोठ्या पक्षाचं स्थान जाऊन दुसरं स्थान पत्करावं लागलं आणि १११ आमदारावरून ७४ आमदारांवर यावं लागलं. पण पक्षातला एकमेव मास लीडर असणं त्यांच्या पथ्यावर पडलं आणि पक्षाच्या या नुकसानाबद्दल त्यांना साधा जाब सुध्दा विचारला गेला नाही. पुढे लालूंनी स्वतःच्या २ मुलांना मंत्रिमंडळात घ्यायला लावलं तर लहान चिरंजीवाला उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा सुध्दा द्यायला भाग पडलं आणि तिथूनच नितीश यांना त्यांची राजकीय चूक उमजू लागली.
नितीश मागच्या १२-१५ महिन्यापासून महागठबंधनाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी आणि आपली राजकीय चूक सुधारण्यासाठी संधीच्या शोधात होते आणि ती देण्यासाठी भाजपच्या धूर्त केंद्रीय आणि बिहार राज्याच्या नेत्यांनी पुरेपूर मेहनत घेतली. लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप काही नवीन नाहीत पण फक्त लालूंवरती आरोप करून नितीश यांना गठबंधन तोडण्यासाठी हवं तसं ग्राउंड भेटणार नाही आणि तसा दबावही तयार होणार नाही हे सुशील मोदी, अमित शाह आणि नरेंद मोदींनी अचूक ओळखलं. असं म्हणतात की राजकारणात काहीच सहज घडत नसतं, सगळं कांही घडवून आणलं जात असतं. मागचे १५-२० दिवस पडद्याआड एक एकांकिका लिहिली आणि सादर केली जात होती आज त्या एकांकीवरून जेंव्हा पडदा उठला तेंव्हा आरजेडी-काँग्रेसचे मंत्री एका क्षणात सामान्य आमदार झाले, विरोधातली भाजप सत्तेच्या दावणीला गेली, मोदी विरोधातील राष्ट्रीय व्यासपीठावर उदयास येऊ पाहत असलेल्या महाआघाडीतला सर्वात आश्वासक चेहरा लुप्त झाला, धर्मनिरपेक्षता नितीश कुमारांच्या लेखी गंगेत विसर्जित झाली, रालोआला राज्यसभेत ९-१० खासदारांचं बळ अलगद येऊन मिळालं आणि बरंच काही पण हे काही असं अचानक घडलं नाही. या नाट्यात केंद्रीय संस्था सुद्धा निर्णायकपणे वापरल्या
गेल्या. लालूंच्या जुन्या प्रकारणांसोबतच लालूंचे मुलं आणि मुली यांच्याशी निगडित प्रकरणं शोधून काढली गेली. मोठ्या मुलाचं पेट्रोल पंपाचं प्रकरण पडदयावर सादर झालं. लालू सोडून सगळा दारुगोळा तेजस्वी यांच्यावर वापरला गेला, त्यांच्याशी निगडित २५ पेक्षा अधिक जमिनीची प्रकरणं एक-एक करून उजेडात आणली गेली. राज्यात सुशील मोदी नावाची तोफ रोज धडाडू दिली, कधी ED, कधी CBI अशा संस्थांनी धाडी टाकल्या, उपमुख्यमंत्र्यांनी ८-८ तास चौकशी केली गेली. या सगळ्यातून नितीश यांच्यावर दबाव येत असल्याचं नाटक रंगवलं गेलं. हे सगळं करून जेंव्हा धर्मनिरपेक्षतेपेक्षा भ्रष्टाचार हा मुद्दा पटलावर अधिक वजनदार झाल्यावर नितीश यांनी जाऊन राजीनामा दिला. बर राजीनाम्यानंतर काय हे सुद्दा पूर्ण ठरलेलं होतं. इकडं नितीश यांनी राजीनामा दिला, अर्ध्या तासात पंतप्रधानांनी नितीश कुमार यांचं जाहीर अभिनंदन केलं, एक तासात भाजपनं काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी ३ सदस्यीय समिती गठीत केली, २ तासात सुशील मोदींनी बिहारला निवडणुकीत ना ढकलण्याची जुनी टेप वाजवली, पुन्हा अर्ध्या तासात भाजप सत्तेत शामिल होणार हेही ठरलं, पुढच्या अर्ध्या तासात भाजपचे आमदार नितीश यांच्या घरी रात्र भोजनासाठी पोहचले, नितीश यांची नव्या आघाडीच्या नेतेपदी निवड झाली आणि २७ तारखेला ५ वाजता शपथविधी होणार हेसुध्दा ठरले. किती ही कर्तबगारी, किती ही तत्परता. आज जरी भाजप आणि जदयू चे नेते आज कितीही हे सगळं ठरलेलं नव्हतं असं पटवून देऊ पाहत असले तरी हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे की बिहारच्या पडद्यावर एक महानाट्य सादर झालेलं आहे. आता या सगळ्या गोंगाटात धर्मनिरपेक्षतेचं काय? सुशासनबांबूचं काय? जनतेनं महागठबंधनला दिलेल्या बहुमताचं काय?? हे अशे अनेक प्रश्न सायलेंट मोडवर vibrate  होत राहतात कुणालाही ऐकू ना येता.

बिहारच्या अकाली घडामोडींनी २०१९च्या निवडणुकीतील थोडीबहुत शिल्लक असलेली  चुरसही धुळीत मिसळवली आहे. दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आज चेहरा कार्यक्रम सगळं काही हरवून बसला आहे, राहुल गांधी जनतेच्या मनात स्वतःबद्दल किंवा पक्षाबद्दल आशा जागृत करण्यात साफ अपयशी ठरले आहेत, पक्षाला ३ वर्षात २ मिनिटाचा कार्यक्रमसुध्दा देऊ शकले नाहीत, पक्ष जुन्या लफड्यामागून लफड्यात अडकतंच चाललाय. पक्षाची हायकमांड हीच पक्षापुढची समस्या झालेली आहे. शरद पवार, नितीश कुमार, मुलायमसिंग यादव हि काही त्यातल्या त्यात मोठी नावं. यातले मुलायम गृहनाट्यात हतबल आणि निरुपयोगी होऊन गेले आहेत, नितीश स्वतःच मोदीच्या सावलीला गेले आहेत. राहाता राहिले पवारसाहेब पण त्यांच्या पक्षाच्या खासदारांचं बळ १२-१५ च्या पुढे काही केलं जाणारी नाही, त्यांच्याबद्दल काँग्रेसला खूप प्रेम आहे असाही नाही आणि ते सुध्दा मोदींच्या बाजुला होणार नाहीतच याची नसलेली  हमी म्हणजे २०१९ ची निवडणूक मोदी विरुद्ध चेहरा नसलेले इतर अशीच होती काय हि भीती. लोकसभेत स्पष्ट बहुमत, स्वपक्षाचा राष्ट्रपती उपराष्ट्रपती, अस्तित्व आणि आवाज विरहित झालेले विपक्ष हे लोकशाहीला चिंतेत पाडणारे नक्कीच आहेत. मोदी या अफाट राजकीय शक्तीला गालबोट लावणार नाहीत असा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात १००% जागवलाय फक्त तो काळाच्या कसोटीवर किती टिकतो हे पाहणं इतकंच सध्यातरी हाती आहे..